यश चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 रोजी त्यावेळी भारतात असलेल्या लाहोरमध्ये
झाला. त्यांना आठ भावंडे होती. शिक्षणासाठी ते जालंधरला गेले. फाळणीनंतर ते भारतात
आले आणि पंजाबमधील लुधियानात वसले. मोठे भाऊ बी. आर. चोप्रा यांच्या मदतीने त्यांनी
तेथे घर घेतले; परंतु चित्रपटांची मोठी आवड असल्याने त्यांनी थेट मुंबई गाठली.
दिग्दर्शक आय. एस. जोहर यांच्यासोबत सहायक दिग्दर्शक म्हणून ते काम करू लागले.
सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांनी "एक ही रास्ता' (1956), "नया दौर' (1957), "साधना'
(1958) या चित्रपटांसाठी काम पाहिले. पुढे 1959 मध्ये त्यांनी "धूल का फूल' या
चित्रपटाचे स्वतंत्रपणे दिग्दर्शन केले. त्यानंतर "धरमपुत्र' (1961), "वक्त'
(1965), "आदमी और इन्सान' (1969) हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.
त्यांची
निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला "दाग' 1973 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर त्यांनी
"जोशिला', "दीवार', "कभी कभी', "त्रिशूल', "सिलसिला', "फासले', "चांदनी', "लम्हे',
"डर', "दिल तो पागल है', "वीर झारा', "जब तक है जान' अशा 22 चित्रपटांचे दिग्दर्शन
केले. "कभी कभी', "दुसरा आदमी', "नूरी', "काला पत्थर', "धूम', "दिलवाले दुल्हनियॉं
ले जायेंगे', "मोहब्बतें', "साथिया', "हम तुम', "बंटी और बबली', "सलाम नमस्ते', "चक
दे इंडिया', "इश्कजादे', "लेडीज व्हर्सेस रिकी बहेल' आदी चित्रपटांची निर्मितीही
त्यांनी केली. त्यापैकी "दिलवाले दुल्हनियॉं ले जायेंगे' आजही मराठा मंदिर
चित्रपटगृहात मुक्काम ठोकून आहे.
चोप्रा यांचा मुलगा आदित्य याने "दिलवाले
दुल्हनियॉं ले जायेंगे' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पहिले पाऊल टाकले. "वीर
झारा' या चित्रपटानंतर त्यांनी अगदी आतापर्यंत चित्रपटाचे दिग्दर्शन केले नव्हते.
त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट "जब तक है जान' दिवाळीत प्रदर्शित होणार
आहे.
चित्रपटसृष्टीला दिलेल्या लक्षणीय योगदानाबद्दल चोप्रा यांना अनेक
पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांना 2005 मध्ये "पद्मभूषण' किताब प्रदान करण्यात
आला. स्वित्झर्लंड सरकारनेही त्यांना सन्मानित केले होते. त्यांना 2001 मध्ये
मानाचा "दादासाहेब फाळके पुरस्कार' प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने राज
कपूर आणि व्ही. शांताराम पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मध्य प्रदेश सरकारने
किशोर कुमार पुरस्काराने सन्मानित केले. "फिल्मफेअर' पुरस्कारांचा मान त्यांना
अनेकदा लाभला. "इंडियन फिल्म ऍकॅडमी'नेही त्यांना गौरवले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment