Sunday, 21 October 2012 18:48
'जब तक थी जान...!'
डेंग्यूच्या आजारामुळे त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
'जब तक है जान' हा आपला अखेरचा चित्रपट असेल, त्यानंतर आपण निवृत्ती घेऊ, असं यश चोप्रा यांनी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणेच नियतीनेही हा त्यांचा अखेरचाच चित्रपट ठरवला.
निवृत्तीनंतर आपण चित्रपटनिर्मितीत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
रोमान्सचा बादशाह म्हणून यश चोप्रा यांची ख्याती आहे. ‘जब तक है जान’ हा त्यांचा कारकीर्दीतला शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत.
यश चोप्रांच्या निधनाची बातमी समजताच शाहरुख खान, अनिल कपूर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी लीलावतीकडे धाव घेतली.
यश चोप्रा यांची बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून ओळख आहे. रोमॅन्टिक फिल्ममधील मास्टर म्हणून ते ओळखले जायचे.
दिवार, कभी कभी, त्रिशूल, सिलसिले मशाल, विजय, चांदणी यांसह दिल तो पागल है, वीर झारा असे सुपरहिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले.
सिनेसृष्टीतील उत्तुंग कामगिरीबद्दल यश चोप्रा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यामध्ये नॅशनल फिल्म अॅवॉर्ड आणि ११ फिल्मफेअर अॅवॉर्डचा समावेश आहे. याशिवाय भारत सरकारच्या दादासाहेब फाळके आणि पद्म भूषण पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
यश चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 ला लाहोरमध्ये झाला होता.
यश चोप्रा यांचं पार्थिव उद्या सकाळी ९ ते १२ या वेळेत यशराज स्टुडिओमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत यश चोप्रांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
No comments:
Post a Comment